Priyadarshi Samrat Ashoka welfare foundation

 


वृद्धाश्रम म्हणजे नेमके काय.....


  मी एका शेतकरी कुटुंबातील शेतमजूरी  करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला हे माझे भाग्य , माझे वडील शेतकरी शेत मजूर म्हणजे त्याच्या नशिबात दारिद्र्यच पाचवीला पुजून ठेवलेले जणू काय ? अशा परिस्थिती मला शिक्षण देणे हे त्यांच्या साठी खूप कठीण होते , गावात चौथी पर्यंतच शिक्षण पुढील शिक्षणासाठी शहराकडे जाने म्हणजे एक मोठी जीवनाची कसोटी  असायची. मी लहान वयात असतानी  आपला पोटचा गोळा दूर शहरात राहण्यास पाठवणे हे खूपच कठीण मायबापाला असते,आपला मुलगा आपल्या पासून दूर पाठवणे माय-बाप्पाला एक आपल काळीज तोडून फेकल्यागत वाटणे हे साहाजिकच आहे .जर मुलाला  पाठविण्याचा विचार केला. किंवा असे हे  शब्द जरी खेड्यातील लोकांपुढे मांडले तर लोकांची निंदानालस्ती पारावरच्या कठड्यावर बसून ऐकायला मिळायची,‘काय याला एकुलता एक पोरग’ पोसण होईन का ? ... लय शिकून बॅरिस्टर होणार हाय! काय ? असे उदगार बापाला लोकांकडून निघायचे, बाप कसा आपल्या  हृदयावर धोंडा ठेऊन आपल्या मुलांच्या भविष्यांसाठी उन्ह,वारा,पाऊस,व गरीबीचे चटके खात, उपासीपोटी राहून आपला मुलगा मोठा साहेब कसा होईल हेच स्वप्न बाप  पहात असतो. तेव्हा आपला मुलगा कोणाकडे राहील व त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार हा तेव्हा त्याला प्रश्न पडतो. अशा वेळी समाजातील समाज हितासाठी अशा काही वेग वेगळ्या माध्यमातून जनहितार्थ काही संस्था कामे करत असतात त्यापैकी मुलांच्या भविष्यासाठी,बोर्डीग जिथे राहण्याची व्यवस्था,भोजनाची व्यवस्था,अभ्यासाची व्यवस्था व मुलांच्या शरीराची काळजी घेणारे संचालक मंडळ व व्यवस्थापन देखभाल करणारे कर्मचारीवर्ग असते, अशा संस्थेचा पुरेपूर विचार करून कसा  प्रवेश मिळेल हे बापाला मोठे आव्हान असते.माझ्या गावी खूप समस्यांना सामोरे जावे लागत होते. बस गाड्यांसाठी रस्ते नसल्यामुळे मोटार वाहतूक नव्हती, गरिबी असल्याने आमच्याकडे शहराकडे जाण्यासाठी घोडा किंवा बैल गाडी सारखे साधन त्या वेळेस आमच्याकडे नव्हते. खेड्यातील मंडळी, शहराकडे प्रवास करण्यासाठी, बैलगाडीचा किंवा घोड्यांचा  सर्रास वापर करायचे, आमच्या शाळेचे शिक्षक त्या वेळेस घोड्यावरती बसून शहराकडून गावाकडे रोज सकाळी सकाळी शाळेसाठी  रुबाबात डोक्यावर काळी टोपी घालून येत असत त्यांचे नाव मनोहरपंत गुरुजी असे तेव्हा त्यांना बोलायचे. वाहतूक नसल्याने पायवाटा असायच्या तिला  “ पांदन वाट” असे तेव्हा म्हणायचे, पांदन म्हणजे एक चिखल मातीचा दोन्ही  बाजूने काटेरी बाभळीचे कुंपण असलेला आत मधून चालण्याचा मार्ग म्हणजेच पांदन, हा मार्ग मला आजही आठवतो  त्या वाटेवरून माझ्या वडिलांनी मला, आपल्या  खांद्यावरती घेऊन एका हाताने मी चिखलात पडू नये म्हणून  घट्ट पकडलेल व दुसऱ्या हातात  माझ्या पुस्तकाची पेटी व मी खांद्यावरती बसून मोठ मोठ्याने आरोळ्या काडून रडायचो “मला नाय जायचं’ मला नायं शिकायचं’....पण  माझे वडील अनवानी पायाने चिखल तुडवीत त्या चिखलात दडलेल्या  काट्या कुट्यानां पायाने तुडवत पायात काटा  रुतला तरीही न थांबत मार्ग काढत होते. मी वडिलांच्या खांद्यावरती बसून केवळ आईवडीलांना सोडून  बोर्डीग मध्ये न राहण्याचे मनातल्या मनात निश्चय केला,मनात वेगवेगळे विचार यायचे  असे वाटायचे की,  बोर्डिंग म्हणजे एक कैद खाना!  वेळेवर तेथे  काही मिळेल का ? या मुळे  ठरवले की आपण जायचेचं नाही , पण माझ्या वडिलांचा ठामपणे निर्णय घेतलेला असल्यांने त्यांना वाटायचे मला चांगले शिक्षण मिळावे चांगले सुसंस्कार मिळावे आणि  शिक्षणानेच  भविष्य घडेल हाच त्यांचा हेतू होता, आम्ही बोर्डीगमध्ये पहोचलो मला माझ्या वयांची मूले बरीच बाहेरच्या मैदानात खेळ खेळतांनी दिसली मनातल्या मनात  मलाही त्यांच्याबरोबर खेळ खेळावे असे वाटू लागले. माझ्या वडीलांनी प्रवेश मिळून दिला.माझ्या वडिलांच्या हातातली लोखंडी पेटी तिथल्या एका माणसांनी त्याच्या हातात घेतली व मन्हाय लागला काका हि पेटी किती जड आहे हो !  बोलत बोलत लांब लचक खोलीत पोहोचलो, बघतोय तर काय तिथे शिस्तबद्ध गाद्या रांगेत टाकलेल्या, एका गादी जवळ एक लोखंडी पेटी उशाला ठेवलेली , वर बघितले तर पंखा,लाईट,खाली पहिले तर चकाकणारी गुळगुळीत मार्बलची फरशी  एवढी स्वच्छता पाहून मला घरच्या पेक्षा बर वाटलं तिथली मूले जवळ येऊन माझ्याशी मित्र समजून  प्रेमाने बोलायला  लागली. वडील घरी जाण्यासाठी खोलीच्या बाहेर निघाय लागले, चालत चालतच आडखळत-आडखळत बोलत होते बाळा चांगल राहायचं हं आतापर्यंत मी रडलो पण मला सोडून जातानी, बापाच हृदयदाटून आलं व  मला धरून ढसाढसा  रडायला लागले, मला काही कळेनासे झाले, बराच वेळ गेला  .. संध्याकाळ होणार लवकर घरी गावाकडे  निघणे हे बापाला गरजेचे होते. मला ही तेथील बोर्डीगमधील मुलांनी समजून सांगीतले,मी हि मुलांची दोस्ती केली आंनदाने राहू लागलो, मला आज प्रश्न पडतो, जे मूले घरात त्रासदायक ठरतात अशाच मुलांना  बोर्डिंगमध्ये टाकतात का ? का आई वडिलांना मुलाला सांभाळणे हे कठीण होते ? का ते मूले घरातील अडचण ठरतात का ? वा इतर आडचणी मुळे... ते उतर मला काही काळाने माझ्यावर वेळ आली तेव्हा मी कामानिमित्त नेहमी बाहेर असायचो, वडिलांना अचानक आर्धागवायू झाला, खूप डॉक्टरांनी इलाज त्यांच्यावर केला पण उपयोग झाला नाही,मी नाशिकमध्ये छोट्याश्या घरात रहात  होतो, माझी पत्नी बालवाडी शिक्षिका, वडील शरीराने धाडधीपाड असल्याने त्यांना उचलने म्हणजेच दोन माणसाचे काम,हे काम करणे आम्हाला नोकरी करून चिंतेचे असायचे,माझी पत्नी शाळा करून घरात वडिलांची काळजीपूर्वक देखभाल करत होती बरेच वर्ष वडील अंथूरणाला खिळलेल्या अवस्थेत होते,एक दिवस असा आला काळाने वडिलांवर झडप घातली पण मी त्यावेळेस त्यांच्या जवळ नव्हतो ती खंत मला माझ्या मनाशी नेहमीची राहून गेली, अशा प्रकारच्या माझ्या सारख्याच समस्या समाजातील बऱ्याचशा कुटुंबाच्या असण्याची शंका नाकारता येत नाही.   

             मी आज वृद्धाश्रम चालवतोय,  मला काही समाजातील व्यक्ती  प्रश्न करतात ते असे की, मूले जबाबदारी का आपल्या आई व  वडिलांची स्वीकारत नाहीत ? का वृद्धाश्रमात टाकतात यासाठीच लहानाचे मोठे आई वडील करतात का ? का अशी वेळ येते आई वडिलांवर.असेही प्रश्न करतात,  आईवडील हे  सूना मुलांचे घरातील आडचन ठरतात का ? काही  अंथूरणावर खिळलेले वयोवृद्ध आहेत त्यांची घरातील मंडळी  काळजी घेऊ शकत नाहीत का ? ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे माझ्या मते प्रत्येक माणसाकडे आहे पण ज्यांच्या वर वेळ येते त्यालाच त्या वेळेचे महत्त्व कळते,काही सुना मूले, जावई- मुलगी आपले आई वडील ज्या ठिकाणी सुखी समाधानी राहू शकताल अशा काही ठिकाणी ते त्यांच्या इच्छेनुसार इतर ठिकाणी किंवा एखाद्या सर्व सुख सुविधा उपलब्ध एका छताखाली उतरत्या वयात मिळतील अशा वृद्धाश्रमात ठेवतात,व वृद्धाश्रमाच्या नियमाने वृद्धाश्रमात वेळोवेळी येऊन भेटणे हे त्यांना बंधनकारक असते, त्यांच्या तब्येतीबद्दल विचार पूस करणे हे मुलांचे कर्त्यव्य आहे व नेहमीच असे काही मूले  करतात पण, असे ही मूले असतात की,समाजातील किंवा नातेवाईक नाव बोट्ये ठेवतील म्हणून वृद्धाश्रमाकडे येत नाहीत व घरात त्यांचा सांभाळ करतांना  अवमान करतात त्यांना त्रास देतात, दिवस दिवस उपाशी पोटी ठेवतात त्यांनी घरात  घाण करू नये या साठी कमी प्रमाणात जेवण देणे,त्यांना एका घरातच  पण वेगळ्या खोलीत ठेवतात  त्यांचा पाणी पिण्याचा पेला वेगळा जेवणाचे ताट वेगळे, त्यांच्या खोलीत लहान मुलांना जाऊ दिले जात नाही,त्यांच्याबद्दल लहानपणीच मुलांच्या मनात भिती निर्माण करून देणे, व जमिनीवरच  फाटकी तुटकी गोधडी टाकून देणे हे दृश्य कोणीही बाहेरील व्यक्तीने किंवा मित्र परिवाराने बघू नये, यासाठी त्यांची नेहमीच खोली बंद ठेवणे, व एक दिवस असा येतो की, घरात वृद्ध व्यक्ती कधी मृत्यू मुखी पडली हे सुद्धा कळत नाही. काही चांगले मूले सुना असतात घरातल्या घरात वयोवृद्धांची सेवा त्यांच्या इच्छेनुसार करतात,पण काही वेळेला वयोवृद्धांची काळजी घेणे कठीण होते असे बरेचसे मूले माझ्याशी संवाद साधतात, बोलतात आम्ही घरी नर्स,वार्डबॉय  ठेवले पण आईला गँगरीन झाला आहे आम्ही खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले होते, दिवसेंदिवस खर्चात वाढ झाल्यामुळे आता आम्ही सरकारी दवाखान्यात ठेवले आहे, परंतु आता आईचे वय खूप असल्याने  या वयात शस्त्रक्रिया पायावर करणे कठीण झाले आहे,व पाय गूडघ्या पर्यंत निकामा झाल्यामुळे, एवढी दुर्गंधी येत असल्याने येथील कर्मचारी जवळपास जाण्यास टाळा टाळ करतात,व घरातही ठेवणे त्यांना कठीण जाते  अशा वेळी मुलांनी काय करावे,पर्याय संपतात व नाईलाजाने आमच्या वृद्धाश्रमाकडे येतात व समाजाने नावे बोटे ठेवले तरीही ते सहन करतात व शेवटच्या क्षणी वृद्धाश्रमात येऊन अंतिम विधी साठी घरी घेऊन जातात. काही असेही असतात,  वृद्धाश्रमात टाकल्या नंतर   काही मूले नातेवाईक असे असतात अंतिम विधीच्या शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या आई वडिलांचा किंवा नातेसंबंध असतांनी सुद्धा  अंतिम विधी करण्यासाठी येत नाहीत मी असे कित्येक अंतिम विधी त्यांच्या संस्कारानुसार, ईश्वरांच्या कृपेनुसार माझ्या हातून ईश्वराने करून घेतले,मी माझे भाग्य समजतो. पण यात वयोवृद्ध दोषी असतात का ? त्यांनी काही पाप कर्म केलेले असतात का ? आपल्या हातात पुण्य, पाप कर्म असतात का ?  असे उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर कित्येक असतात, पोटच्या मुलांनी बायकोच्या रोजच्या झगड्यामुळे ( वादातून ) वृध्द आईला तिसऱ्या माळ्यावरून खाली ढकलले ! त्यात जागीच वृध्द आईचा  मृत्यू झाला. असे कित्येक वेगवेगळी उदाहरणे ऐकायला व बघायला मिळतात यात दोषी कोण ?          

मला बोर्डीग मधील तेव्हाचे दिवस आठवले परिस्थिती मुळे म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा ते दिवस आंनदात घातले. आज त्या दिवसामुळे मी हृदयातून गरजूं अंध,अपंग,मतिमंद,निराधार व जेष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध यांची सेवा आमच्या कडून ईश्वर करून घेत आहे.उतरत्या वयांची काळजी घेण्यासाठी म्हणा....माझ्यामते  वृद्धाश्रम ही संस्था म्हणजे एक प्रकारे लॉजिंग आणि  बोर्डिगच आहे. (बोर्डीग)  निवास-भोजन     (हॉस्पिटल )  वैद्यकीय सल्ला, उपचार, ( शाळा ) नव्याने गोष्टी शिकाव्या लागतात, ( कुटुंब ) विस्तारित नाती आणि सामाजिक संबंध अशा अनेक संस्था एकत्रित मिळून निर्माण झालेली व्यवस्था म्हणजे वृद्धाश्रम हे आहे. वेळ बदलत गेला तसे दिवस बदलत गेले आणि तो काळही बदलला त्यामुळे   मी वृद्धाश्रमाची व्याख्या अशी केली आहे ती अशी, ‘निवास, भोजन, वैद्यकीय सल्ला यांसारख्या सोयी उपलब्ध करून देणारी वृद्धाश्रम ही अशी संस्था आहे की जेथे वृद्धांना आवश्यक असणारी सुरक्षितता आणि मानसिक शांतता मिळते.’  वृद्धाश्रमाचे  अनेक प्रकार आहेत. कोण चालविते यानुसार सरकारी आश्रयावर चालणारे, धार्मिक, आध्यात्मिक संस्थांद्वारे चालविले जाणारे, ट्रस्टमार्फत चालविले जाणारे आणि व्यावसायिक संस्थां मार्फत चालविले जाणारे असतात. वृद्धाश्रमध्ये प्रवेशाच्या अटींवरून विचार केला तर फक्त पुरुषांसाठी, फक्त स्त्रियांसाठी किंवा दोघांसाठीही प्रवेश उपलब्ध असणारे, अंध, अपंग, मानसिक रुग्ण, हिंडते फिरते, परावलंबी अशा वेगवेगळ्या गटांसाठी पैसे घेऊन किंवा न घेऊन असे वृद्धाश्रमे आहेत, पण आमचे  वृद्धाश्रम हे सर्वा साठी खुले आहे.

अलीकडच्या काळात भारतातील पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून विभक्त कुटुंब पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत आहे. छोटी छोटी कुटुंबे निर्माण झाल्याने आई-वडिलांवर एकाकी राहण्याची वेळ आली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठांनीही ती स्वीकारली आहे  त्याचे कारणे वेगवेगळी असतात, मी  वृद्धाश्रम संस्थापक या नात्याने मला एकांतात येऊन काही जेष्ठ नागरिक स्वतः बद्दल आपल्या मनातील दु:ख सांगतात. पण घरातच अपमानास्पद वागणूक देणे, दुर्लक्ष करणे, घरातील कामे सांगणे यांसारख्या गोष्टी घडतात. त्यामुळे अनेक ज्येष्ठांनाही वृद्धाश्रमच आपलेसे  वाटू लागले आहे. कारणे काहीही असोत, पण ज्येष्ठ आणि त्यांची मुले, सुना, मुली, जावई यांच्या ओढाताणीवर मार्ग निघावा आणि ज्येष्ठांचे उर्वरित आयुष्य सुखात जावे या कल्पनेतून वृद्धाश्रमांचा जन्म झाला.

             ज्येष्ठांनी समवयस्कांसोबत वेळ घालवावा, त्यांच्या राहण्या व खाण्याची,गोळ्या औषधी - काळजी घेतली जावी म्हणून वृद्धाश्रम निर्माण झाले. ज्यांच्याकडे वृद्धाश्रमाला देण्याएवढे पैसे आहेत ते  तिथे जाऊन आश्रय घेतात, पण ज्यांच्याकडे संपती ही नाही व स्वतः काम करण्याची ताकद राहत नाही व अशा वयोवृद्ध मातापित्यांना सांभाळणे मुलांना कठीण जाते अशा वेळेस त्यांनी काय करावे ? मी वृद्धाश्रम चालवत असतांना रात्रंदिवस कोणत्याही  वेळेस मोबाईल वर वयोवृद्धांच्या समस्यांचे फोन  येत असतात तेव्हा खूप दु:ख वाटते, अशा परिस्थितीत जागे अभावी त्यांना प्रवेश देता येत नाही,ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, एकदा प्रवेश मिळाला की, वृद्धाश्रमातच अंतिम श्वास घेणे  पसंत करतात,त्यामुळे वृद्धाश्रमात जागा रिक्त होत नाहीत, त्यामुळे इतरांना प्रवेश देणे शक्य होत नाही, याची आमच्या मनात सदैव खंत असते. आमच्या वृद्धाश्रमाची जागा भाडे तत्वावर आहे,त्यामुळे समाजातील दानशुर व्यक्तींनी यावर विचार करून जर आर्थिक सहाय्य केले तर मला इतर बाबींकडे लक्ष देवून या वयोवृद्धांसाठी भरपूर काही करता येईल कि ज्या माझ्या मनात मी कल्पना करून ठेवलेल्या आहेत, शासन अशा वृद्धाश्रमांना आर्थिक मदत तर सोडाच पण साधे लक्ष सुद्धा देण्यास तयार नसतात. वृद्धाश्रमात ठराविक देणगी किंवा पैसे देऊन राहता येते. पण काही समाज कंटकांनी वृद्धाश्रमाची व्याख्या आगदी चुकीची करून पसरवत असतात, वास्तविक वयोवृद्ध हे आश्रमात का येतात याचा ते कधीही विचार करीत नाहीत व जुन्या कल्पनेचा विचार करून आपापसात आश्रमाची कुचेष्टा करतात,तसेच आश्रमात आलेले वयोवृद्ध हे त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात काही पाप कर्म केल्यामुळे त्याची शिक्षा भोगण्यासाठी आश्रमात येतात हेच अशी मंडळी गृहित धरतात, त्यामुळे गरजू वयोवृद्ध आश्रमाकडे येण्याचे टाळतात. स्वइच्छेने जे वयोवृद्ध येतात त्यांना त्यांचे नातेवाईक येऊन भेटतात त्यात त्यांचा खरा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळतो व ते आनंदी जीवन आमच्या वृद्धाश्रमात  व्यतीत करतात.


 

 

जसजसे  आमच्या  या  वृद्धाश्रमाबद्दल समजत आहे तस तसे इथे येणाऱ्या वृद्धांची संख्या व निराधारांची संख्याही वाढत जात आहे. मात्र आता मलाही आर्थिक अडचणींमुळे मर्यादा येत आहेत. सरकारने जर माझ्या कामाची दखल घेऊन अन्नधान्य किंवा जागेच्या स्वरुपात मदतीचा हात पुढे केला तर मी अधिक

अंध,अपंग,मतीमंद,मनोरुग्ण, अंथूरुणाला खिळलेले वयोवृद्ध व तसेच जेष्ठ नागरिक व निराधारांची जास्तीत जास्त सेवा आम्ही देऊ शकतो,  सध्याचे आमचे  ‘वृद्धाश्रम’ भाड्याच्या इमारतीमध्ये सुरु असल्यामुळे त्यावर प्रत्येक महिन्याला न झेपवणारा खर्च होतो. सरकारकडून जागा मिळाली तर खूप मोठी मदत होईल, असे या वृद्धाश्रमाच्या संचालिका,सौ. ललिता नवसागर व संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष श्री टी.एल.नवसागर व संस्थेचे पदाधिकारी असे म्हणतात.

          

                                                                        हृदयातून लेखन करणारे ...

                                                                           श्री. टी. एल. नवसागर


    २०१२ साली एका भाड्याच्या जागेत मी टी एल  नवसागर व पत्नी ललिता नवसागर (दांपत्य ) आम्ही  ‘मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम’ सुरु केले. कालकथीत.लक्ष्मण.तु.नवसागर वडिलांच्या स्मरणार्थ सुरु केल्यामुळे आईवडिलांचे हृदयातस्थान असल्याने आम्ही वृद्धाश्रमाचे उदघाटन हे माझी आई  मातोश्री.नर्मदा नवसागर यांच्या पावन स्पर्शाने त्यांच्या हस्ते दिनांक १४ डिसेंबर २०१२ साली, सकाळी १० वाजता उदघाटन केले. प्रेसमिडीयाने तिन चार दिवसा  पूर्वीच  वृद्धाश्रमाची बातमी छापल्याने, उदघाटन प्रसंगीच तिन ते चार  निराधार वृद्धांनी  मानवसेवा केअर सेंटरमध्ये प्रवेश मिळवला, त्यातील पहिली निराधार आजी हि इगतपुरी भागातील होती,  आम्ही स्वतः त्यांची देखभाल करायचो, हळूहळू ही संख्या वाढतच गेली, आणि वयांची अट नसल्याने, आज या घडीला वयांच्या ६ वर्षापासून ते शंभरी पार केलेले  एकूण नव्वद जण ‘मानवसेवा’ च्या कुटुंबातील सदस्य आहेत असे. त, जसजशी व्याप्ती वाढत गेली तसतशी कर्मचारी संख्या सुद्धा वाढत गेली. मात्र इथला सर्व खर्च मी व माझी जीवनसंगिनी सौ ललिता नवसागर यांच्या अथक परिश्रमातून व माझ्या ट्रान्सपोर्ट मालकीच्या मालवाहू गाड्यांच्या येणार्‍या रकमेतून, स्वतःच्या पैशातून खर्च करत असल्यामुळे मला कर्मचाऱ्यांच्या इच्छेनुसार फार मोठे पगार देणं शक्य होत नाही. त्याशिवाय इथे असलेले अनेक अंध, अपंग, मतीमंद, मनोरुग्ण व जेष्टनागरिक तसेच अंथरुणाला खिळलेले वयोवृद्ध असतात तर काहींना मानसिक आजार असतो. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून स्वच्छतेची अपेक्षा आपण करु शकत नाही. त्यामुळे त्यांनी केलेली घाण दररोज रात्रंदिवस कित्येक वेळेस साफ करणे, अशा वातावरणात राहून मनोभावे त्यांची सेवा करणे यासाठी एक विशेष सेवाभावी मानसिकता असावी लागते. त्यामुळे मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम मध्ये कर्मचारी सहसा टिकत नाहीत. जे कर्मचारी आमच्याकडे सुरवाती पासून काम करत आहेत त्यांचं मला खूप कौतुक वाटतं, वृद्धाश्रमातील काही वृद्धही त्यांना जमेल ते काम आपल्या घरातलं काम समजून स्वेच्छेने करतात.


Comments